सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनाने दिली ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा


अभिनेत्री कंगना राणावत बऱ्याच दिवसांनी शिवेसना खासदार संजय राऊत यांच्यासोबत झालेला वाद, महापालिकेने केलेली कारवाई या सर्व घडामोडींनंतर पुन्हा एकदा मुंबईत आली. कंगना मुंबईत पोहोचल्यानंतर लगेचच सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला पोहोचली. तिच्यासोबत यावेळी बहिण रंगोली, भाऊ आणि वहिनी होती. दरम्यान यावेळी कंगनाने पुन्हा एकदा मुंबईमध्ये वास्तव्य करण्यावरुन अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

कंगना राणावतने मंदिराबाहेर येताच ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिली. दरम्यान तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, मुंबईत राहण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे आणि ती मला मिळाली आहे. मी अजून कोणाकडे परवानगी मागितलेली नाही.


सिद्धिविनायक मंदिराबाहेरचे फोटो कंगनाने ट्विटरवर शेअर केले आहेत. तिने यामध्ये म्हटले आहे की, माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभे राहिल्यानंतर शत्रुत्वाचे प्रमाण आश्चर्यचकित करणारे होते. मी आज मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुरक्षित आणि स्वागत केल्यासारखे वाटत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये आपल्या कुटुंबासोबत कंगना सुट्टी घालवत होती. कंगना राणावत नुकतीच मुंबईत दाखल झाली. तिच्यासोबत यावेळी कडक सुरक्षाव्यवस्था होती. ठाकरे सरकारसोबत झालेल्या वादानंतर कंगनाला देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे.