ईडीनंतर मुंबईतील भाजपच्या कार्यालयासमोर झळकले “हे” पोस्टर


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली असून पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला होता. तर ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांकडून भाजपचे बॅनर लावण्यात आले. या बॅनरनंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेरही ईडी कार्यालय असल्याचे बॅनर लावण्यात आले आहे.


काल (२८ डिसेंबर) ईडीच्या कार्यालयाबाहेर संतप्त शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालय असल्याचे बॅनर लावले होते. त्यानंतर भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर रात्री उशिरा अशाच स्वरूपाच बॅनर लावण्यात आले. ते कुणी लावले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण हे पोस्टर शिवसैनिकांनी लावले असावे, असे सांगितले जात आहे. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर अंमलबजावणी संचालनालय, असे सुरूवातीलाच लिहिले आहे. त्याचबरोबर भाजपविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात, असा देखील उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. या बॅनरचा फोटो पत्रकार सोहित मिश्रा यांनी ट्विट केला आहे.