शिवसैनिकांनी ईडीच्या मुंबईमधील कार्यालयावर लावला भाजपा प्रदेश कार्यालयाचा बॅनर


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले. त्यांना हे समन्स पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बजावण्यात आले आहे. पण आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे.

यासंदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना ईडीने रविवारी पाठवल्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे. सध्या सोशल मीडियावर या बॅनर्सचे फोटो व्हायरल झाले आहेत.

हा बॅनर शिवसैनिकांनी लावल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहचले. पण हा बॅनर तुम्हाला काढता येणार नाही. तुम्हाला हवे तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा, असे पोलिसांना शिवसैनिकांनी सांगितले. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आलेल्यानंतर हा बॅनर खाली पोलिसांनी उतरवला.