अशाप्रकारचे राजकारण यापूर्वी महाराष्ट्राने कधी पाहिलेले नाही – अनिल देशमुख


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले. त्यांना हे समन्स पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बजावण्यात आले आहे. तर, या अगोदर देखील ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, प्रफुल्ल पटेल, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या महाविकास आघाडीच्या नेत्यांना समन्स बजावण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर भाजपवर निशाणा साधला आहे. अशाप्रकारचे राजकारण यापूर्वी महाराष्ट्राने कधी पाहिले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.

भाजप नेत्याच्या किंवा धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची, सीबीआय चौकशी लावायची. सीबीआयबाबत तर आम्ही निर्णय घेतला आहे की, आमच्या परवानगी व्यतिरिक्त महाराष्ट्रात कुणाचीही सीबीआय चौकशी होऊ शकत नाही. पण जो अधिकार ईडीचा आहे, तो त्यांचा अधिकार आहे व त्याचा एकप्रकारे राजकारणासाठी वापर करणे हे महाराष्ट्रात कधी पाहिले गेले नसल्याचे अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

तर ईडीचा हा खेळ नवा नाही. भाजपाच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जात असून केंद्र सरकार यातून विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.