पुरावे असल्याशिवाय चौकशी करत नाही ईडी : नारायण राणे


सिंधुदुर्ग : ईडीने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पाठवलेल्या नोटीसचे भाजप नेते नारायण राणे यांनी समर्थन केले आहे. नेहमी संजय राऊत बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. ईडीचा वापर भाजप करत नाही. ईडी आणि सीबीआय केंद्र सरकार अंतर्गत आहे. ईडी आणि सीबीआय पुरावे असल्याशिवाय कोणाची चौकशी करत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

पीएमसी बँकेत त्यांनी गैरव्यवहार केले. एक कोटीला घेतलेली मालमत्ता किती कोटीची आहे? आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीला कशी काय मिळाली? आणि मग एक कोटीला कर्ज दाखवायचे, म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले, म्हणून ईडीने ही नोटीस दिली. ईडी वैगेरे असेच कोणी नोटीस देत नसल्याचे नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजप ईडीला हाताशी घेऊन सूडाचे राजकारण करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असा घणाघात केला आहे.