मुंबई : राजकीय विरोधकांना जेव्हा राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारे वापरावी लागतात. सीबीआय, ईडीचा वापर राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सुरु आहे. पण आमच्यासाठी ईडीची नोटीस मोठा विषय नाही. ईडीच्या नोटीसला आम्ही घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचे केलेले नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ईडीने राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवल्याच्या चर्चेनंतर मुंबईतील शिवसेना भवनात राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपवर यावेळी त्यांनी सडकून टीका केली. एवढेच नाही तर सरकार टिकू देऊ नका, असे सांगत भाजपचे काही नेते धमकावत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
ईडी, सीबीआयचा वापर राजकीय भडास काढण्यासाठी : संजय राऊत
राजकीय विरोधकांना जेव्हा राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारे वापरावी लागतात. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना वर्षभरात नोटीस आली आहे. आता माझ्या नावाचाही गजर सुरु असून ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचे केलेले नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले.
घरातील महिलांना, कुटुंबीयांना लक्ष्य करणं ही नामर्दानगी आहे. या नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआड खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान वर्षा राऊत उद्या चौकशीला जाणार की नाही याबाबत अद्याप ठरवलेले नाही. ही राजकीय कारवाई आहे. त्यामुळे याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा करुनच निर्णय घेणार आहोत, असेही राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत ईडी नोटीससंदर्भात बोलताना म्हणाले की, ईडी आमच्याशी गेल्या दीड महिन्यांपासून पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती हवी होती. आम्ही त्यासंदर्भात सर्व कायदपत्रे दिली आहे. परंतु या पत्रव्यवहारात कोणत्याही चौकशीचा उल्लेख केलेला नाही. भाजपची पक्षाची माकडं कालपासून उड्या मारत आहे की पीएमसी बँक प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. याची माहिती भाजपला कशी काय माहिती आहे? ईडीने भाजपशी हातमिळवणी केली आहे का?
सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असून त्यासाठी धमकावले जात असल्याचा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला. याविषयी राऊत म्हणाले की, भाजपचे काही महत्त्वाचे लोक आणि त्यांचे हस्तक सातत्याने माझी भेट घेऊन हे सरकार टिकवू नका, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी धमकवण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांचा बाप आहे. त्यांनी अनेकांच्या नावाची यादी दाखवली. त्यांना केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगण्यात आले. तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला अटक करा पण या सरकार धक्काही लागू देणार नाही.