धोनीला दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार


दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयसीसीच्या दशकातील पुरस्कारांवर टीम इंडियाच्या खेळाडूंनी छाप उमटवली असून दशकातील खेळभावना पुरस्कार टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पटकावला आहे. धोनीसह एकूण 7 जणांना या पुरस्करासाठी नामांकन मिळाले होते. या 6 जणांना मागे टाकत धोनीने हा पुरस्कार मिळवला आहे.

या पुरस्काराच्या शर्यतीत टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली, केन विल्यमन्सन, डॅनियल व्हिटोरी, महिला जयवर्धने आणि मिस्बाह उल हक हे खेळाडू होते. क्रिकेटमध्ये काही खेळाडू हे चिडखोर वृत्तीचे असतात. पण धोनी याला अपवाद असल्यामुळेच तो उजवा ठरतो. आयसीसीचा हा पुरस्कार धोनीला त्याच्या प्रामाणिकपणा आणि खेळाडूवृत्तीमुळे जाहीर झाला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2011 मध्ये नॉटिंघममध्ये सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात इयन मॉर्गन आणि इयान बेल खेळत होते. मॉर्गनने मारलेला फटका सीमारेषेवर अडवण्यात आला. पण चेंडूने सीमारेषेला स्पर्श केल्याचे बेलला वाटले. त्यामुळे हा चौकार असल्याचे गृहीत धरुन बेलने दुसऱ्या दिशेला निघाला. पण यावेळेस टीम इंडियाच्या खेळाडूने बेलला रनआऊट केले.

बेलला थर्ड अंपाअरने बाद घोषित केल्यानंतर टी टाईम झाला. चहापानानंतर तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला. तेव्हा मॉर्गनसह बेलही मैदानात आल्यामुळे क्रिकेट चाहते चक्रावले. पण गैरसमजामुळे बेल बाद झाला, हे धोनीच्या लक्षात आल्यामुळे धोनीने कर्णधार या नात्याने बेलला फलंदाजीसाठी बोलावले. सर्वच स्तरातून धोनीच्या या निर्णयाचे कौतुकही करण्यात आले. तसेच धोनीला त्याच्या या खेळाडूवृत्तीचे बक्षिस मिळाले.

धोनीसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार जाहीर केला आहे. विराटला एकूण 5 पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आले होते. त्यापैकी विराटला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराचा मान मिळाला आहे.