गिफ्ट द्यायला आलेल्या सांतामुळे १५७ लोकांना कोरोनाची लागण, तर १८ जणांचा मृत्यु


ब्रूसेल्स : कोरोनाचे संकट अद्याप कायम असले तरीही देशभरात नाताळ हा सण आनंदाने साजरा केला जात आहे. जगभरात ख्रिसमसचा उत्साह कोरोनाचे सर्व नियम पाळत पाहायला मिळाला. पण बेल्जियममध्ये या सणाला एका घटनेमुळे गालबोट लागला आहे.

बेल्जियमच्या केअर होममध्ये सगळ्यांना आनंद आणि गिफ्ट द्यायला आलेल्या सांतामुळे १५७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका परदेशी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सांताक्लॉजने होम केअरला भेट दिली होती त्यावेळी सांताक्लॉजला झालेल्या कोरोनामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार बेल्जियममध्ये एन्टवर्पच्या केअर होममध्ये कर्मचारी तेथे राहणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना आनंद देऊ इच्छित होते. यासाठी त्यांनी ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजला बोलवून गिफ्ट देण्याचा प्लान केला. त्यांनी यासाठी केअर होममध्येच देखभाल करणाऱ्या एका चिकित्सक व्यक्तीलाच सांताक्लॉज होण्यासाठी तयार केले. आणि याचाच त्यांना मोठा फटका बसला.

ठरल्याप्रमाणे सांताक्लॉज केअर होममध्ये आला आणि त्याने तेथील ज्येष्ठ मंडळींसोबत चांगला दिवस घालवला. त्यांना गिफ्ट दिले आणि त्यांच्यासोबत अनेक खेळ खेळले. तोपर्यंत त्या व्यक्तीला आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती नव्हती. त्यानंतर त्याची तब्बेत बिघडल्यावर त्याने कोरोनाची चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर केअर होममधील देखील एक एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. मिळालेल्या रिपोर्टनुसार केअर होममधील १२१ लोकांना आणि ३६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरूवातीला ५ लोकांना आणि त्यानंतर १३ लोकांनी असे एकूण १८ लोकांनी आपला जीव गामावला आहे.