कोणाचेही पाऊल ठेवण्याचे धैर्य होणार नाही अशी काही ठिकाणे


नव-नवीन ठिकाणी पोहोचण्याची, नवनव्या वस्तूंचे शोध लावण्याची चढाओढ आजच्या प्रगत युगामध्ये सतत चालूच असते. पूर्वी कोणीही मानव कधीही न पोहोचू शकलेल्या अतिशय निबिड ठिकाणांवरही आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मानव पोहोचला आहे. मात्र या जगामध्ये अशी काही ठिकाणे अजूनही आहेत, जिथे पोहोचण्याची हिम्मत आजवर कोणीही करू शकलेले नाही. त्या ठिकाणांवरील आणि त्यांच्या सभोवार असलेली परिस्थिती इतकी असामान्य आहे, की त्यामुळे या ठिकाणी पोहोचणे अशक्यप्राय होऊन बसले आहे.

यॉर्कशायर येथे ‘द स्ट्रीड ‘ नामक एक अतिशय अरुंद, खळाळता झरा आहे. पण या झऱ्यामध्ये उतरण्याचे धैर्य आजवर फार कमी लोकांना झाले आहे. आणि ज्यांनी हे धैर्य दाखविले त्यांच्या आपले प्राण गमवावे लागले. अतिशय वेगवान प्रवाह आणि पाण्याच्या पातळीच्या खाली आणि दोन्ही बाजूंना अतिशय अणकुचीदार खडक असणाऱ्या या झऱ्यामध्ये एखादा माणूस पडलाच, तर अवघ्या काही मिनिटातच त्याच्या शरीराच्या चिंध्या होतात असे येथील स्थानिक रहिवासी सांगतात. नुसते पाहायला हा झरा अतिशय निर्मळ, सुंदर दिसतो. पण त्याचे हे वरवरचे रूप फसवे असून, वास्तविक या झऱ्यामध्ये पाण्याचे अतिशय वेगवान ‘अंडर करंट’, किंवा प्रवाह आहेत.

न्यू मेक्सिको या भागामध्ये नऊ तलाव असे आहेत, ज्यांच्या तळांचा ठाव आजवर लागलेला नाही. या तलावांमध्ये उतरणारे डायव्हर्स आणि पट्टीचे पोहोणारे देखील या तलावांमधून जिवंत बाहेर येत नाहीत असे म्हणतात. तसेच या तलावांमध्ये एक भले मोठे कासव ही असल्याची आख्यायिका जवळपासच्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र या विशालकाय कासवाचे दर्शन कोणाला अद्याप झालेले नाही. येथील स्थानिक ‘काऊ बॉईज’ ना या तलावांचा सर्वप्रथम शोध लागला. पण वास्तविक हे तलाव नसून विशालकाय ‘सिंक होल्स’ असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या तलावांमध्ये असलेल्या जलपर्णीमुळे त्यातील पाणी वेगळ्याच निळसर हिरव्या रंगाचे दिसते.

अमेरिकेतील मॉर्गन आयलंड हे ४,५०० एकरांचा विस्तार असलेले बेट असून, या बेटावर मनुष्याला जाणे केवळ अशक्य आहे. कारण या बेटावर केवळ वानरांचे वास्तव्य असून, या सर्व वानरांना हर्पीस-बी रोगाची लागण झाली आहे. हा रोग मनुष्यासाठी जीवघेणा आहे. या बेटावर वानरांची वस्ती १९७० सालापासून असून, येथे सुमारे तीन हजार वानरे आहेत. ‘नॅशनल इंस्टीट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन्स’ ही संस्था या वानरांचा उपयोग रिसर्चसाठी करीत असते. मात्र या बेटावर कोणालाही जाण्याची परवानगी नाही.

चीनमध्ये एक डोंगर असा आहे, ज्याच्यामधील गुहेमध्ये सम्राट क़्विन शी हुआंग डी याची कबर आहे. आजवर कोणीही येथे आलेले नाही, किंवा ही गुहा उघडण्याचा प्रयत्न केलेला नाही. जर कोणत्याही कारणाने ही गुहा आणि कबर उघडली गेली, तर कोणती तरी मोठी अशुभ घटना घडेल अशी आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे. इतिहासकारांच्या मते या गुहेमध्ये अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू असण्याची शक्यता आहे, पण या गुहेशी निगडित मान्यता लक्षात घेता, चीन सरकारने देखील ही गुफा उघडण्यास बंदी घातली आहे.

Leave a Comment