या देशांमध्ये पसरली आहे नव्या कोरोनाची दहशत


नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या तीन प्रकारांची पडताळणी मागील काही दिवसांमध्ये झाल्यामुळे साऱ्या जगावर ओढावलेले हे संकट आणखी गंभीर होत असल्याचे चित्र व त्याची दहशत सर्वत्र पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार अधिक घातक मानला जाण्यामागे कारण म्हणजे या व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण हे जवळपास 70 टक्के वेगाने आणि अधिक प्रमाणात होण्याची माहिती अभ्यासकांकडून देण्यात येत आहे.

14 डिसेंबरला सर्वप्रथम युकेमधून कोरोनाच्या या नव्या प्रकारची माहिती जाहीर करण्यात आली होती. ज्याला VUI-202012/01 असे नाव देण्यात आले. यावर अद्यापही संशोधन सुरुच आहे. त्याचबरोबर असे देखील सांगितले जात आहे की, हा नवा प्रकार सप्टेंबर महिन्यातच आकारास आला असावा.

दक्षिण आफ्रिकेतील संसर्गजन्य रुग्णांमध्ये 501.V2 या नावाचा वॅरिएंट हा मोठ्या प्रमाणात आढळून आला. 24 डिसेंबरला आफ्रिकेच्या disease control body च्या प्रमुखपदी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नायजेरियामध्ये कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार P681H आढळला. पण, याचा संसर्ग झपाट्याने होण्याचे प्रमाण मात्र तुलनेने कमी असल्याचे सांगितले जात आहे.

या देशांमध्ये पसरली आहे नव्या कोरोनाची दहशत
ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाकडून 21 डिसेंबरला देण्यात आलेल्या माहितीनुसार युकेमधून परतलेल्या दोन जणांना कोरोना संसर्ग झाला असून, त्यांच्या माध्यमातून देशात नवा प्रकार पोहोचला आहे.

डेन्मार्क – डेन्मार्कमध्ये कोरोनाच्या नव्या 9 रुग्णांची माहिती समोर आल्याच्या वृत्तावर जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब केले आहे.

कॅनडा – कोरोनाच्या नव्या प्रकारचा संसर्ग झाल्याचे रुग्ण 26 डिसेंबरला कॅनडामध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली.

फ्रान्स – ब्रिटनहून परतलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली असून, 25 डिसेंबरला फ्रान्सकडून त्यात हा नवा प्रकार आढळल्याची माहिती देण्यात आली. या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्यामुळे त्याला स्वगृही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

इटली – कोरोनाच्या नव्या प्रकारचा संसर्ग झालेला दुसरा रुग्ण इटलीच्या अॅन्कोनामध्ये 23 डिसेंबरला आढळला. पण, या रुग्णाचा युकेशी कोणताही थेट संपर्क आला नव्हता. आता अशीही माहिती देण्यात येत आहे की युकेमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळला नव्हता.

जपान – 25 डिसेंबरला जपानमधून युकेहून परतलेल्या 5 प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याची बाब समोर आली.

लेबनॉन – लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार लंडनहून परतलेल्या विमानातून आलेल्या प्रवाशांमार्फत तेथेही कोरोनाचा नवा प्रकार पोहोचला. परिणामी देशात आलेल्या अशा प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नेदरलँड्स – 24 डिसेंबरला आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार युकेमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार तेथे अॅम्सटरडॅममध्ये संक्रमित झालेल्या 2 रुग्णांमध्ये दिसून आला आहे.

नायजेरिया – नायजेरियाच्या आरोग्य विभाग प्रमुखांनी 24 डिसेंबरला दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या नव्या प्रकाराचा उदय हा नायजेरियामध्ये झाला होता. ऑगस्ट 3 आणि ऑक्टोबर 9 या दिवशी घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी दोन रुग्णांच्या नमुन्यांत हा प्रकार आढळून आला.

स्पेन – कोरोनाच्या नव्या प्रकाराचे चार रुग्ण स्पेननध्ये आढळून आले, ज्यांचा युके प्रवासाशी थेट संबंध होता. अजूनही 3 रुग्णांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

दक्षिण आफ्रिका – दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेल्या 501.V2 या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे आरोग्य विभागाची भीती आणखी वाढवली आहे. पहिल्या सर्व प्रकारांपेक्षा हा नवा प्रकार अधिक प्रमाणआत झपाट्याने संसर्ग पसरवत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

स्वीडन – तेथील एका प्रवाशाला युकेहून परतल्यानंतर प्रकृती बिघडल्याच्या तक्रारीनंतर कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. यानंतर मात्र इतर कोणालाही याचा संसर्ग झाल्याचे वृत्त नाही.

युनायटेड किंग्डम – युकेचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी 14 डिसेंबरला दिलेल्या माहितीनुसार तेथे कोरोनाच्या नव्या प्रकारचा संसर्ग झालेले 1000हून अधिक रुग्ण आढळले आहेत. पुढे 23 डिसेंबरला कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार तेथे आढळून आला. ज्या रुग्णांचा संबंध दक्षिण आफ्रिकेतील कोरोना प्रकाराशी जोडण्यात आला.