असा आहे बच्चे कंपनीच्या लॉलीपॉपचा इतिहास


लॉलीपॉप बहुतेक सर्वच लहान मुलांना आणि मोठ्यांनाही मनापासून आवडतो. रंगेबिरंगी आणि निरनिरळ्या फ्लेवर्सचे लॉलीपॉप जगभरामध्ये सगळीकडे इतके लोकप्रिय आहेत, की या पदार्थाच्या सन्मानार्थ दर वर्षी जुलै महिन्यामध्ये चक्क ‘वर्ल्ड लॉलीपॉप डे’ देखील साजरा केला जातो. ह्या दिवशी सर्वांनी आपल्या आवडीच्या रंगांचे आणि फ्लेवर्सच्या लॉलीपॉप चाखण्याचा आनंद मनसोक्त घ्यायची परंपरा पाश्चात्य देशांमध्ये रूढ आहे. पण हा सर्वांचा आवडता पदार्थ अस्तित्वात कसा आला याची कथा पुष्कळांना फारशी माहिती नाही.

लॉलीपॉपचे निर्माण सर्वात पहिल्यांदा कोणी आणि कसे केले याची कथा मोठी रोचक आहे. ‘एक्स्ट्रा-ऑर्डीनरी लिटील क्रॉनिकल्स ऑफ द वर्ल्ड बुक’च्या नुसार लॉलीपॉपचे निर्माण न्यू हॅवन येथील कनेक्टीकट मध्ये राहणाऱ्या जॉर्ज स्मिथ नामक इसमाने केले. १९०८ साली जॉर्जने एक चिकट, पण अतिशय चविष्ट द्रव पदार्थ तयार केला. हा पदार्थ थंड झाल्यावर कडक होत असे. हा पदार्थ लोकांना खाऊ घातल्यानंतर तो लोकांना आवडू लागला. त्यामुळे हा पदार्थ बाजारामध्ये आणण्याचा निश्चय जॉर्जने केला. या पदार्थाला बाजारामध्ये आणण्यासाठी त्याला काही तरी नाव देणे गरजेचे होते. त्यामुळे १९३१ साली या पदार्थाचा ‘लॉलीपॉप’ हा ट्रेडमार्क जॉर्ज स्मिथ यांनी आपल्या नावे करविला. ‘लॉलीपॉप’ या नावाने प्राचीन काळी घोड्यांची शर्यत होत असे. याच शर्यतीचे नाव जॉर्जने आपल्या निर्मितीला दिले.

लॉलीपोपचे निर्माण जरी जॉर्ज स्मिथ यांनी केलेले असले, तरी लॉलीपॉप बनविणाऱ्या मशीनचे निर्माण मात्र कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या सॅम नामक इसमाने केले. एकदा लॉलीपॉप बनविणाऱ्या स्वयंचलित मशीनचे निर्माण झाल्यानंतर लॉलीपॉपचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होऊ लागले. हळू हळू हा पदार्थ जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आणि लोकप्रियही झाला. आजच्या काळामध्ये लॉलीपॉप जगामध्ये सर्वत्र सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. आताच्या काळामध्ये लॉलीपॉपचे रंग, आकार आणि फ्लेवर्स यामध्येही भरपूर विविधता आली आहे.

Leave a Comment