दही भात खा, आनंदी रहा…


जेवण करताना पोटभर दहीभात खाल्ला, तर त्यानंतर येणारी डुलकी अगदी अनावर होते, हा अनुभव आपल्यापैकी बरच जणांनी घेतला असेल. पण ह्यामागे असणाऱ्या शास्त्रीय कारणांची माहिती मात्र लोकांना फारशी नसते. दह्यामध्ये ट्रीप्टोफॅन नामक एक विशिष्ट अॅमिनो अॅसिड असते. हे तत्व शरीरासाठी अतिशय आवश्यक तत्वांच्या पैकी एक आहे. पण विशेष गोष्ट अशी, की हे तत्व आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही. म्हणजेच हे तत्व आपल्या आहारातून मिळवले जाते. शरीरातील सेरोटोनीन, आणि मेलाटोनीन ह्या महत्वपूर्ण तत्वांच्या निर्मितीसाठी ट्रीप्टोफॅनची गरज असते. सेरोटोनीन हे रसायन आपली मनस्थिती, भूक आणि झोप नियंत्रित करीत असते. तसेच स्मरणशक्ती आणि एकाग्रता नियंत्रित करण्यासही हे तत्व सहायक असते.

पण दह्यामध्ये असणारे ट्रीप्टोफॅन हे तत्व आपल्या मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी ह्याला अन्य अॅमिनो अॅसिड्सची गरज असते. ही इतर अॅमिनो अॅसिड्स मिळतात आपण खात असलेल्या भातातून, म्हणूनच जेवणाच्या शेवटी त्ताकभात किंवा दही भात खाण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशन मध्ये ही ह्या पद्धतीचे समर्थन केले जाऊन, कर्बोदके असलेल्या पदार्थाच्या जोडीने दह्याचे सेवन केले गेल्यास ट्रीप्टोफॅन आपल्या मेंदूपर्यंत पोहोचणे शक्य होत असल्याचे म्हटले आहे.

ट्रीप्टोफॅन मुबलक प्रमाणामध्ये असलेले दही आणि कर्बोदकांचे उत्तम स्रोत असलेला भात खाल्ल्याने मेंदू अधिक तल्लख, सक्रीय राहतो, कारण ट्रीप्टफॅनमुळे सेरोटोनीनची निर्मिती अधिक प्रमाणामध्ये होते. तसेच दहीभाताच्या नियमित सेवनाने एकाग्रता वाढते. शांत झोप लागते आणि त्यामुळे मनही प्रसन्न राहते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment