दिऊ ह्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या किल्ल्याचे रुपांतर तेथील तुरुंगामध्ये केले गेले होते. पण आता भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने ह्या किल्ल्याला ‘हेरीटेज साईट’चा दर्जा देण्यात आल्यामुळे ह्या तुरुंगामधील कैद्यांना इतरत्र हलविण्यात आले असून, आता ह्या तुरुंगामध्ये केवळ एकाच कैदी आहे. तीस वर्षे वयाच्या ह्या कैद्याच्या कोठडीमध्ये एक लहानसा टीव्ही, त्याला पांघरण्यासाठी एक ब्लँकेट, पिण्यासाठी पाणी आणि पन्नास चौरस मीटर्सचे मोकळे प्रांगण इतकेच त्याच्या सोबतीला आहे. हा कैदी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून, त्याच्यावरील खटल्याची सुनावणी अद्याप व्हायची आहे. ही सुनावणी होऊन ह्या कैद्याला शिक्षा झाली, तर त्याला गुजरातेतील अमरेली येथे असणाऱ्या तुरुंगामध्ये पाठविण्यात येईल.
हा किल्ला ४७२ वर्षांपूर्वी पोर्तुगीझांनी बनवविला होता. ह्या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात आला आहे. २०१३ साली हा तुरुंग बंद करण्याचा अध्यादेश जारी झाल्यानंतर ह्यामध्ये नवे कैदी पाठविले गेले नव्हते. भारतीय पुरातत्व खात्याने पर्यटन वाढावे ह्या उद्देशाने ह्या किल्ल्याचे पुनरुज्जीवन व्हावे ह्यासाठी हा किल्ला ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा तुरुंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ह्या तुरुंगामध्ये आधीपासून असलेले केवळ सातच कैदी होते. ह्यामध्ये दोन महिला कैद्यांचाही समावेश होता. ह्या सातपैकी चार कैदी अमरेलीच्या तुरुंगामध्ये पाठविले गेले. तर दोन कैद्यांची शिक्षेची मुदत संपल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले. आता ह्या तुरुंगामध्ये केवळ एकच कैदी आहे.
भारतातील ह्या तुरुंगामध्ये आहे एकच कैदी…!
दिवसातून दोन तास क्या कैद्याला त्याच्या कोठडीबाहेर येऊन मोकळ्या हवेमध्ये फिरण्याची मुभा आहे. त्याशिवाय संध्याकाळी चार ते दुसऱ्या इवशी सकाळी सहा वाजेपर्यंत येथे पहाऱ्यासाठी असणारे शिपाई इतकाच काय तो ह्या कैद्याचा इतरांशी संपर्क. तुरुंगातील बाकी कोठड्या, येथील टेहेळणी करिता बांधले गेलेले टॉवर्स, स्वयंपाकघर, भोजनगृह, सर्व काही निर्मनुष्य आहे. एकाच कैद्यासाठी जेवण बनविण्यासाठी स्वयंपाकी ठेवणे शक्य नसल्याने जवळच्या हॉटेलमधून ह्या कैद्यासाठी जेवण मागविले जाते. आता ह्या तुरुंगामध्ये पाच जेल गार्ड, आणि एक उप-निरीक्षक इतकेच कर्मचारी आहेत. हे सर्व आपल्या शिफ्टनुसार आपली ड्युटी बजावीत असतात.
सर्वसाधारणपणे तुरुंगातल कैद्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जात असतात. ह्यामध्ये ह्यांना शिक्षणाची, नवे कौशल्य आत्मसात करून त्याद्वारे आपली जीविका चालविण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जात असतात. पण दिउच्या तुरुंगामध्ये एकाच कैद्यासाठी काय आणि किती करायचे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या पुढला प्रश्न आहे. पण जोवर ह्या कैद्याला येथून हलविले जात नाही, तो पर्यंत त्याच्यावर देखरेख करणे ही त्यांची जबाबदारी आहे. ह्या कैद्याला डिसेंबर महिन्यामध्ये अटक झाली असून, त्याच्यावरील खटल्याची सुनावणी अद्याप व्हायची आहे. ह्या सुनावणीनंतर त्याला शिक्षा झाल्यास त्याला अमरेली येथील तुरुंगामध्ये पाठविण्यात येईल त्यानंतर मात्र हा तुरुंग संपूर्णपणे बंद केला जाईल.