दम्याचा विकार असल्यास आजमावा हे उपाय


प्रदूषण, सतत बदलते हवामान, त्यामुळे उद्भविणाऱ्या अॅलर्जी, किंवा अनुवंशिकता यामुळे अनेक व्यक्तींना दम्याचा त्रास सुरु होतो. हा त्रास उद्भविण्यास वयाची मर्यादा नाही. अगदी लहानांपासून ते वृद्ध व्यक्ती, कोणालाही हा त्रास, कधीही उद्भवू शकतो. या विकारामध्ये श्वास घेण्यास त्रास होतो, अगदी हलक्या शारीरिक श्रमानेही दम लागतो. अश्या वेळी त्वरित औषधोपचार केले जाणे गरजेचे असते. या औषधांच्या शिवाय काही घरगुती उपायांनीही दम्यामुळे उद्भविणारा त्रास कमी करता येऊ शकतो.

मेथी दाण्याच्या सेवनाने शरीरावर अॅलर्जीमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. यासाठी थोड्या पाण्यामध्ये काही मेथीदाणे घालून हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्यावे. त्यानंतर या पाण्यामध्ये थोडासा मध आणि आल्याचा रस घालून याचे सेवन सकाळी आणि संध्याकाळी करावे. याने अॅलर्जीमुळे उद्भविणारा दमा नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते.

सुकी अंजिरे ही चवीला अतिशय मधुर आणि आरोग्याला हितकारी असे फळ आहे. रात्री झोपण्यापूर्वी काही सुकी अंजीरे गरम पाण्यामध्ये भिजत घालावीत आणि सकाळी उठल्यानंतर ही अंजिरे रिकाम्या पोटी खावीत. अंजिरे भिजविलेले पाणी ब जीवनसत्व युक्त असल्याने या पाण्याचे देखील सेवन करावे. अश्या प्रकारे सुक्या अंजीरांचे सेवन केल्याने श्वासनलिकेतील कफ सुटून येऊन इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो.

ज्यांना वारंवार दम्यामुळे श्वसनास त्रास होत असेल, त्यांनी मोहोरीच्या तेलामध्ये कापूर घालावा, आणि या तेलाने छातीवर मालिश करावी. लहान मुलांच्या बाबतीत हा उपाय विशेष प्रभावी ठरतो. मसाज केल्यांनतर काही वेळाने गरम पाण्याने स्नान करावे. हा उपाय सातत्याने काही दिवस केल्यास दम्यामुळे उद्भविणारा श्वासाचा त्रास कमी होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment