हे घरगुती उपाय तुम्ही आजमावून पाहिलेत का?


आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक लहान मोठ्या तब्येतीच्या तक्रारी उद्भवत असतात. अश्या प्रकारच्या अनेक तक्रारींसाठी अनेक घरगुती उपाय आपल्याकडे गेली अनेक शतके, घरोघरी अवलंबिले जात आहेत. या उपायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू सर्वांच्याच घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असतील अश्याच आहेत. अश्या या साध्या सोप्या उपायांची माहिती, खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

अनेकदा आपल्याला अचानक उचकी सुरु होते. कितीही पाणी प्यायले, साखर चघळली, तरी उचकी काही थांबत नाही. अश्या वेळी चमचाभर साजूक तूप गरम करून त्याचे सेवन केल्यास उचकी थांबते. घसा खवखवत असल्यास वेलदोडा चघळावा. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर लगेच एक लहान वेलदोडा चावून खावा आणि त्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे. यामुळे घसा खवखवणे थांबते.

वारंवार तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अॅसिडीटी होते. अश्या वेळी जिरे आणि ओवा समप्रमाणात घेऊन पाण्यामध्ये उकळून घ्यावे. त्यानंतर हे पाणी गाळून घेऊन त्या पाण्यामध्ये थोडीसाखर घालून त्याचे सेवन करावे. त्यामुळे अॅसीडीटी नाहीशी होते. जर रक्तदाब अचानक कमी झाला, तर आल्याच्या लहानशा तुकड्यावर थोडासा लिंबाचा रस आणि सैंधव घालून खाण्यास द्यावे. यामुळे रक्तदाब योग्य प्रकारे नियंत्रित होतो.

वजन घटविण्यासाठी दररोज एक कप पाण्यामध्ये एक लहान चमचा बडीशेप घालून हे पाणी चांगले उकळावे. त्यानंतर हे पाणी थंड होऊ द्यावे. हे पाणी थंड झाल्यानंतर याचे सेवन करावे. या उपायाने वजन घटण्यास मदत होते. ज्यांना रात्री झोप लागण्यास त्रास होतो, लवकर झोप लागत नाही, अश्या व्यक्तींनी दररोज रात्रीच्या जेवणाबरोबर एक वाटी ताजे दही खावे. काही दिवसांतच निद्रानाशाचा विकार दूर होऊ लागेल.

कांद्याच्या रसामध्ये मोहोरीचे तेल मिसळून या मिश्रणाने सांध्यांची मालिश केल्याने सांधेदुखीच्या वेदना कमी होतात. तसेच ज्यांना मायग्रेनचा त्रास परत परत होत असेल, त्यांनी दिवसातून चार ते पाच वेळा सहा-सात तुळशीची पाने चावून खावीत. काही दिवसातच मायग्रेनचा त्रास कमी झाल्याचे जाणवेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment