DCGI कडून कोव्हिशिल्डला आपातकालीन वापरासाठी मिळू शकते परवानगी


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 लस उत्पादक कंपन्यांनी DCGI कडे लसीच्या आपातकालीन वापरासाठी अर्ज केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी सीरम इन्स्टिट्युटच्या कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीला भारतामध्ये पहिली परवानगी मिळू शकते अशी दाट शक्यता आहे.

दरम्यान ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे. भारतामध्ये सीरम इन्स्टिट्युट त्याचे उत्पादन करत असून कोव्हिशिल्ड या नावाने मानवी चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान पुढील आठवड्यात ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतामध्येही कोविड 19 प्रतिबंधक समितीचे तज्ञ त्याचा आढावा घेऊन भारतामध्येही तातडीने लसीच्या वापराला मंजुरी देऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

सीरमच्या कोविशिल्ड सोबतच भारत बायोटेक आणि फायझर कंपनीकडून देखील तातडीच्या वापरासाठी परवानगी द्यावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान भारत बायोटेकच्या अद्याप तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू आहेत. तर फायझर कंपनीकडूनही प्रेझेंटेशन अद्याप देण्यात न आल्यामुळे भारतात आपातकालीन वापरासाठी लस उत्पादक कंपन्यांच्या सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आता सीरम बाजी मारू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील आठवड्यातच सीरमकडून काही आवश्यक अधिकची माहिती देखील पुरवण्यात आली आहे.

ब्रिटनमधील कोरोनामध्ये म्युटेशन झाले असल्यामुळे नवा कोरोना अधिक वेगाने संसर्ग पसरवू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या लंडनसह जगभरात भीतीचे वातावरण आहे. पण सध्या मंजुर झालेल्या लसी म्युटेट झालेल्या कोरोनावरही परिणामकारक असेल असे सांगितले जात आहे. त्याचा लसीच्या निर्मितीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. पुण्यातील या कंपनीने युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका सोबत करार केला आहे. या कंपनीने 40 मिलियन डोस बनवलेले आहेत.