सुशांतसिंगची हत्या की आत्महत्या: देशमुख यांचा सीबीआयला सवाल

नागपूर: अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने नक्की आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल राठोड यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) केला आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासाचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनताच नव्हे तर संपूर्ण देशाला सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने नेमका काय तपास केला हे जाणून घ्यायचे आहे. लोक माझ्याकडे त्याबद्दल वारंवार विचारणा करीत आहेत.  त्यामुळे माझी सीबीआयला विनंती आहे की सुशांतची हत्या झाली की ती आत्महत्याच होती हे त्यांनी जाहीर करावे, असे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देऊन आता ५ ते ६ महिने झाले आहेत. त्यामुळे आता सीबीआयने त्याच्या मृत्यूचे कारण लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी देशमुख यांनी केली.

सुशांतचा मृतदेह दि. १४ जून रोजी मुंबईतील बांद्रा येथे त्याच्या घरात सापडला होता. अकस्मात मृत्यूचा प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून मुंबई पोलीस या प्रकरणी तपस करीत होते. त्याचा दरम्यान पाटणा येथे बिहार पोलिसांनीही त्याच्या वडीलांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. ऑकटोबरमध्ये ‘एम्स’च्या न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या पथकाने सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावताना हा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.