…तर त्यांना 10 फूट खोल खड्ड्यात गाडू, शिवराज सिंह चौहान यांचा इशारा


होशंगाबाद : देशभरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने कृषि कायद्याला विरोध करत आहेत. तसेच आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नाही. त्यातच आता होशंगाबाद येथील ‘शेतकरी सन्मान निधी योजना’ या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थिती दर्शवली. त्यांनी यावेळी एक भाषणही केले. त्यांनी या भाषणादरम्यान गुन्हेगार आणि माफियांना इशारा दिला. ते म्हणाले की माफियांनी माझे बोलणे नीट ऐकावे, त्यांनी जर काही गडबड केली तर त्यांना 10 फूट खोल खड्यात गाडले जाईल.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी यावेळी व्यासपीठावरून दिवंगत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ जनतेला ‘सुशासन’ देण्यात येत असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी राज्यात लोकांच्या जमीन बळकवणाऱ्या आणि माफिया लोकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, राज्यातील लोकांच्या जमिनी बळकवणाऱ्या इकडे माफियांनो लक्ष देऊन नीट ऐका, जरा जरी गडबड केली तर 10 फूट खड्यात गाडले जाईल. यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी व्यासपीठावरून जिल्हाधिकाऱ्यांचीही कानउघडणी केली. त्यांनी म्हटले की एकही पैसा लोकांकडून न घेता, त्यांची कामे झाली पाहिजेत. जनतेपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचवणे म्हणजेच सुशासन होय. आता मी खूप डेंजरस फॉर्म मध्ये असल्यामुळे सर्वांनी आपापली जबाबदारी नीट पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.