मुंबई – दिल्लीच्या सीमेजवळ सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या विश्वासर्हतेवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेजवळ केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये दलाल, भांडवलदार आणि अडत्यांचा समावेश असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मजास करुन घेणारे आंदोलक यापूर्वी देशाने कधी पाहिले नसल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.
प्रवीण दरेकरांनी शेतकरी आंदोलनाच्या विश्वासर्हतेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
इचलकरंजीमध्ये प्रसारमाध्यमांशी गुरुवारी दरेकर यांनी संवाद साधला. त्यांनी त्यावेळी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. पूर्वी शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टी हे ओळखले जायचे. पण त्यांना आता राजकारणातच जास्त रस असल्याचा टोला दरकेरांनी लगावला. कोणत्या जगात शेट्टी हे वावरत आहेत?, असा प्रश्नही दरेकरांनी उपस्थित केला. शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्या गेल्याने त्याची डागडुजी करण्याची गरज शेट्टींना आहे. शेतकरी नेता ही त्यांची ओळख पुसली गेली असल्याचे म्हणत दरेकरांनी शेट्टींवर हल्लाबोल केला. स्वत:ला अजूनही शेट्टी हे शेतकरी नेते समजतात हे त्यांच्या डोक्यातील खूळ असल्याचा टोलाही दरेकरांनी यावेळी लगावला. शेट्टींवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नसून त्यांचे लक्ष्य आता फक्त विधानपरिषदेच्या आमदाराकीकडे आहे. शेट्टींमध्ये सत्य स्वीकारणाचे धाडस नसल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला आहे.
तसेच दरेकर यांनी शुक्रवारी रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चातर्फे चंदूर (ता. हातकणगले) येथे आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर किसान यात्रेच्या निमित्ताने सभेत दिलेल्या भाषणामधुनही शेट्टींवर पुन्हा निशाणा साधल्याचे दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे राजू शेट्टी यांनी करू नये. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये व बागायतीसाठी ५० हजार रुपये देण्याच्या वचनाचे काय झाले. शेतकऱ्यांना चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याच्या वचनाचे काय झाले याचेही उत्तर जनतेला द्या, असा सणसणीत टोला दरेकर यांनी शेट्टी यांना लगावला. देरकर यांनी आपल्या भाषणामध्ये महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत सरकारने केवळ खोटी आश्वासने दिल्याची टीकाही केली.
ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या पायातील बेडय़ा निघतील, त्या दिवशी शेतकरी सुखी होईल, असे शरद जोशी नेहमी सांगायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेच धोरण अबलंबिले असल्याचे नमूद करून दरेकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या गोष्टी आम्हाला करतात, पण अख्खा भाजप बांधावर जाऊन संवाद साधत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जायची भीती आम्हाला नाही, शेतकरी आमचा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जे गेले होते व नंतर आपलेच वचन विसरले, त्यांना आधी विचारा असा सवाल दरेकर यांनी केला. या प्रसंगी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडाळकर, माजी आमदर सुरेश हळवणकर उपस्थित होते.