अमिताभ बच्चन यांनी चोरल्या माझ्या कविता, एका महिलेचा आरोप


सोशल मीडियावर बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सक्रिय असतात. ते फक्त सोशल मीडियावर पोस्ट लिहितात असे नाही, तर ते चाहत्यांच्या प्रश्नांचेदेखील मजेशीर पद्धतीने उत्तरेसुद्धा देत असतात. तसेच ते ऑनलाईन ब्लॉग्ज, फोटो, व्हिडीओज, सुविचार, कविता शेअर करत असतात. पण फेसबूकवर एका महिलेने एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिने अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. ट्विटरवर एक कविता अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केली आहे. ही कविता आपली असून ती शेअर करताना त्याचे क्रेडिट अमिताभ बच्चन यांनी दिले नसल्याचे आपल्या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे.


त्या महिलेचे नाव टीशा अग्रवाल असे असून टीशा या कवियित्री आहेत. दरम्यान आपल्या अधिकृत ट्विटरवर अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली कविता टीशा यांनी २४ एप्रिल २०२० मध्ये लिहून फेसबुकवर पोस्ट केली होती. अमिताभ बच्चन यांनी हीच कविता २४ डिसेंबरला आपल्या ट्विटरच्या अकांऊटवरून शेअर केली आहे. टीशा अग्रवाल यांच्या हे लक्षात येताच त्यांनी जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याचे क्रेडिटही देत नाहीत..अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख.., अशा आशयाची पोस्ट केली आहे.

टीशा यांनी एका न्यूज वेबसाइटशी बातचीत करताना सांगितले की, ही कविता मी २४ एप्रिल, २०२०ला लिहिली होती. जेव्हा अमिताभ बच्चन यांची पोस्ट मी पाहिली तेव्हा मला असे वाटले की या ओळी मी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर मी जेव्हा चेक केले तेव्हा ही कविता माझीच होती. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर मी कमेंट केली की कमीत कमी मला याचे क्रेडिट तर दिले पाहिजे. मला वाटले की त्यांचा पीआर हे प्रकरण बघेल पण मला वाटत नाही की यावर कोणी लक्ष दिले असेल. यासोबतच टीशाने सांगितले की काही लोकांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा सल्ला दिला आहे. ती पुढे काय करणार आहे, याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. तर अमिताभ बच्चन यांच्याकडून टीशाच्या पोस्टनंतर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच अमिताभ बच्चन यावर काय स्पष्टीकरण देतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.