साप-शिडीतील काही चौकोन आहेत ‘मोक्ष पटम’याचे प्रतीक


संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ‘मोक्ष पटम’ ह्या खेळाचे निर्माण केले. त्यानंतर अनेक वर्षांनी ब्रिटीश भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी ह्याच खेळाला ‘स्नेक्स अँड लॅडर्स’ असे नाव दिले, हाच खेळ आपणा सर्वांना ‘साप-शिडी’ या नावाने परिचित आहे. लहानग्यांपासून ते अगदी वयस्क व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आवडीचा आणि सर्वांना अगदी सहज खेळता येणारा असा हा खेळ आहे. ह्या खेळामध्ये शंभर ‘घरे’ किंवा चौकोन असतात हे आपल्याला माहिती आहेच. पण या चौकोनांमधील काही चौकोन विशिष्ट गोष्टींचे प्रतीक आहेत, हे तथ्य लोकांच्या फारशा परिचयाचे नाही.

ह्या खेळातील बारावा चौकोन भक्तीचे, विश्वासाचे प्रतीक आहे, तर एकावन्नावा चौकोनही विश्वास, भरोसा दर्शवितो. सत्तावन्नावा चौकोन दानशूरपणाचे प्रतिक आहे, तर ७६वा चौकोन ज्ञान, बुद्धी दर्शविणारा आहे. ७८वा चौकोन तपश्चर्या, प्रयत्नशीलता दर्शविणारा आहे. ह्या खेळामध्ये हे चौकोन असे आहेत ज्यांच्याद्वारे वरच्या चौकोनांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी शिड्या आहेत. ह्या शिड्यांवरून वर सरकून मधले चौकोन वगळून थेट वरील ओळींमधील चौकोनांमध्ये पोहोचणे शक्य असते. ह्यापैकी ४१वा चौकोन अवज्ञा, ४४वा चौकोन गर्विष्ठपणाचे तर ४९वा चौकोन असभ्यतेचे प्रतीक आहे. ५२वा चौकोन चौर्यकर्माचे, ५८वा चौकोन असत्याचे, ६२व चौकोन नशेचे तर ६९वा चौकोन आर्थिक कर्ज दर्शविणारे आहेत.

ह्या पटावरील ८४वा चौकोन क्रोध, ९२वा चौकोन लोभ, ९५वा चौकोन गर्व, तर ७३वा चौकोन हत्या, आणि ९९वा चौकोन वासनेचे प्रतीक आहेत. ह्या चौकोनांमध्ये आपल्या शिकारीला गिळंकृत करणारे सर्प आपल्याला पाहायला मिळत असतात. ह्या पटावरील शंभरावा चौकोन मोक्ष, किंवा निर्वाणाचे प्रतीक आहे. पटावरील चौकोनांमध्ये असणाऱ्या शिड्यांची टोके प्रत्येकी एका देवाचे प्रतीक आहेत. ह्या मध्ये कैलास, वैकुंठ आणि ब्रह्मलोकातील देवादिकांचा समावेश आहे. खेळामध्ये जसजशा सोंगट्या पुढे सरकत जातील, तसतसे त्या त्या चौकोनातील गुण-अवगुणांच्या मुळे खेळाडू खेळामध्ये शिडीद्वारे पुढे जातो, किंवा सापावरून घसरून मागे येतो. असा हा खेळ खेळाडूला ‘मोक्ष’ मिळेपर्यंत, म्हणजेच खेळाडूची सोंगटी शंभराव्या घरामध्ये पोहोचेपर्यंत रंगतो.

Leave a Comment