या भाज्या तुमच्या ओळखीच्या आहेत का?


पालक, मेथी, माठ, चाकवत, अळू, शेपू ह्या पालेभाज्या आपल्या नेहमीच्या परिचयाच्या आहेत. ह्याच भाज्या आपण लहानपणापासून पाहत, खात आलो आहोत. सध्या अनेक पाश्चात्य खाद्यपदार्थ चलनात असल्यामुळे केल, चार्ड इत्यादी भाज्यांची नावे देखील आल्या कानी पडत असतील. हिरव्या पालेभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरतात. ह्या पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्वे, अँटी ऑक्सिडंटस् आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये असतात. ही सर्व तत्वे आरोग्यासाठी उत्तम आणि संतुलित आहाराचे प्रतीक आहेत.

पण आपल्या परिचयाच्या ह्या नेहमीच्या भाज्यांच्या शिवाय आपल्या देशाच्या अनेक भागांमध्ये अश्या अनेक स्थानिक भाज्या उपलब्ध आहेत, ज्या
आपल्या आवडत्या भाज्यांप्रमाणेच चविष्ट आणि पौष्टिक आहेत. अनेक लहानमोठ्या आजारांवर औषधी म्हणून वापरले जाण्यापासून ते तोंडलावणीसाठी भाजी म्हणून ह्या भाज्या भारताच्या ग्रामीण भागांमध्ये अगदी नियमित वापरल्या जात असतात. ह्या भाज्यांची ओळख करून घेऊ या. भारतामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रांतांमध्ये ‘बिच्छू बुटी’ नामक पालेभाजी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध तिबेटन गुरु मिलारेपा, अरण्यामध्ये तपस्या करीत असताना ही पालेभाजी शिजवून त्याचे सेवन करीत असल्याची आख्यायिका येथील स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. जर ह्या पालेभाजीला हात लावला, तर हाताला खाज सुटून बारीक पुरळही येऊ शकते. ही खाज आणि पुरळ दोन तासांमध्ये निवळते, पण एकदा ही भाजी शिजविली की मग मात्र ह्यापासून कोणताही अपाय नाही. ही पालेभाजी नैसर्गिक ‘डाययुरेटिक’ आहे, रेचक आहे आणि हाडांच्या आणि मूत्राशयाच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे.

आपल्याकडे हळदीची पाने गोवा, व कोकणामध्ये जास्त वापरली जातात. हळदीची पाने वापरून बनविलेले ‘पातोळे’ हा पदार्थ येथील खासियत आहे. हा पदार्थ अतिशय चविष्ट आहेच, आपण त्याशिवाय हळदीची पाने अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगलही आहेत. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिसणारी लिंगारू ही भाजी दह्यामध्ये शिजविली जाते. चवळीच्या शेंगेप्रमाणे दिसणाऱ्या ह्या भाजीच्या शेंगेचे एक टोक वाटोळे असते. ह्या भाजीचे लोणचे घातले जाते, तर काही ठिकाणी ही भाजी दह्याच्या ग्रेव्हीमध्ये शिजविली जाते. हीच भाजी आसाममध्ये ढेकिया झाक ह्या नावाने ओळखली जाते. ह्या भाजीमध्ये जीवनसत्वे, ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स, अँटी ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.

पुई साग किंवा मलबारी पालक ही भाजी कर्नाटकातील काही प्रांतांमध्ये होते, व पश्चिम बंगालमध्ये ही भाजी खाल्ली जाते. ही भाजी वेलीवर होत असून, ह्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच ह्यामध्ये फायबर, लोह आणि जीवनसत्वे मुबलक असतात. त्याचप्रमाणे शेवग्याची पाने देखील अतिशय पौष्टिक असतात. शेवग्याच्या शेंगा आपल्याकडे आमटी, सांबारमध्ये नेहमीच वापरल्या जात असतात, पण शेंगांच्या इतकी शेवग्याची पाने देखील पौष्टिक आहेत. ह्यामध्ये जीवनसत्वे, क्षार मुबलक असून ही भाजी अनिमिया, संधिवात, दमा ह्या व्याधींच्या साठी लाभकारी आहे. पालकाची आणखी एक जात म्हणजे कलमी साग. ही भाजी जास्त करून रानामध्ये किंवा नदी किनारी, किंवा भाताच्या शेतांमध्ये उगविते. ह्याची पाने लांब असून ह्याचे देठ पोकळ असते. ही भाजी प्रथिने, जीवनसत्वे आणि इतरही अनेक पौष्टिक तत्वांनी युक्त आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment