जाणून घेऊ या लोणच्याचा रोचक इतिहास


लोणचे हे भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतमध्ये अतिशय प्राचीन काळापासून, लोणची बनविण्याची पद्धत येथील लोकांना अवगत होती. तसेच त्या काळी फळे व भाज्यांचा हंगाम आणि ऋतू पाहून त्या त्या वेळी जे पदार्थ उपलब्ध असतील ते पदार्थ व त्यांच्याबरोबर इतर मसाले आणि तेले योग्य प्रमाणामध्ये वापरून, वर्षभर टिकून राहणारी लोणची बनविली जात असत. खाद्यपरंपरा कोणत्याही राज्याची असो, ह्यामध्ये लोणच्याचा समावेश आहेच. जेवणाच्या ताटामध्ये अनेक पदार्थ असले, तरी एका लोणच्याच्या फोडीने भोजानाचा स्वादच बदलून जातो. लोणच्याला इंग्रजी भाषेमध्ये ‘पिकल’ म्हटले जाते. हा शब्द आणि पदार्थ पाश्चात्य देशांमध्ये चौदाव्या शतकामध्ये अस्तित्वात आला. हा पदार्थ बनविण्यासाठी भाज्या आणि फळे ह्यांचा वापर होऊ लागला. जसजसा काळ बदलला तसतशी आपली खाद्य संस्कृतीही बदलली हे जरी खरे असले, तरी लोणचे आजही आपल्या खाद्यसंस्कृतीचा महत्वाचा भाग आहे, हे ही तितकेच खरे आहे.

लोणचे जेवणाची रुची वाढवितेच, पण त्याशिवाय ह्याद्वारे अनेक पौष्टिक तत्वे ही आपल्या शरीराला मिळत असतात. अगदी आंबा, लिंबे, आवळे इथपासून ते मुळा, गाजर, फ्लॉवर, कारली, इथपर्यंत कोणत्याही फळे, किंवा भाज्यांची लोणची घालता येतात. काही लोणची कमी काळ टिकणारी, तर काही वर्षभरदेखील उत्तम टिकणारी असतात. लोणच्याच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर ख्रिस्तपूर्व २०३० सालामध्ये मेसोपोटेमियामधील रहिवासी काकडीचे लोणचे वापरत असल्याचा उल्लेख अनेक प्राचीन ऐतिहासिक लेखांमध्ये सापडतो. त्याकाळी उत्तर भारतातील लोक काकडीचे बियाणे घेऊन टिगरिस व्हॅली मध्ये गेले आणि अश्या रीतीने तिथे काकडीची पैदास सुरु झाली असे म्हणतात.

इजिप्शियन सौंदर्यवती क्लियोपात्रा हिला काकडीचे लोणचे अतिशय प्रिय असून, सुप्रसिद्ध दार्शनिक अरास्तु ह्यांनीही आपल्या लिखाणामध्ये काकडीच्या लोणच्याचे वर्णन आणि त्याच्या सेवनाने आरोग्याला होत असणाऱ्या लाभांचा उल्लेख केला आहे. संपूर्ण आशिया खंडामध्ये लोणचे हा पदार्थ जवळजवळ प्रत्येक देशाच्या, प्रांताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये समाविष्ट आहे. कोरिया देशामध्ये तर लोणच्याचा इतिहास तीन हजार वर्षांचा आहे. कोरियामध्ये लोणच्याची परंपरा आली, ती चीनमधून. परंपरा चीनी असली, तरी कोरियावासियांनी तिचा स्वीकार करून आपल्या खाद्यसंस्कृतीनुसार त्यामध्ये बदल घडविले.

सोळाव्या शतकामध्ये युरोपमध्येही अनेक पदार्थांवर प्रक्रिया करून ते टिकवून ठेवण्याची पद्धत सुरु झाली. परिणामी टोमॅटो केचप, निरनिराळे जॅम, जेली आणि मुरंबे चलनात आले. तसेच भाज्या आणि फळे ह्याची लोणची बनविली जाऊ लागली. लोणचे रोजच्या जेवणातील असो, किंवा खास निमित्ताने बनविले गेलेले कुठल्या विशेष भाजी किंवा फळाचे असो, हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आणि भोजनाची रुची वाढविणारा आहे ह्यात शंका नाही.

Leave a Comment