एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस?


जळगाव : ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस मिळाल्याची चर्चा असून 30 डिसेंबर रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. खडसेंना ही नोटीस पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पण अशा प्रकारची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार भाजपला रामराम ठोकत ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर खडसेंच्या उत्तर महाराष्ट्रातील काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन असेही खडसे यांनी पक्ष सोडताना सांगितल्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडीची नोटीस मिळेल अशी खडसे यांना कल्पना होती. पण पण सध्यातरी अशी कुठली नोटीस नसल्याचे खडसे सांगत आहेत.

जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी बँकेतील घोटाळा उघडकीस आणण्याच्या हालचाली खडसे यांनी सुरु केल्या होत्या. भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच एकनाथ खडसे यांनी आपली ईडी चौकशी होण्याची शक्यचा वर्तवली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता.