लहान मुलांमध्ये अॅनिमिया कसा ओळखावा?


अॅनिमिया हा विकार अनेक व्यक्तींमध्ये आढळणारा विकार आहे. रक्तामध्ये पुरेश्या निरोगी लाल रक्तपेशी नसल्याने हा विकार उत्पन्न होतो. शरीरातील प्रत्येक अवयवाला प्राणवायूचा पुरवठा करणे हे लाल रक्तपेशींचे, किंवा हिमोग्लोबिनचे काम असते. अॅनिमियाच्या विकारामध्ये या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात. जर लहान मुलामध्ये अॅनिमिया असेल, तर या मुलांचा चेहरा फिकट दिसू लागतो, सतत थकवा जाणवतो, आणि मुले चिडचिडी होऊ लागतात.

जर लहान मुलांच्या शरीरामध्ये लोह आणि इतर पौष्टिक तत्वांच्या अभावी पुरेश्या लाल रक्तपेशी तयार होत नसतील, तर त्यांना अॅनिमिया होतो. तसेच जर काही कारणाने रक्तस्राव झाला असेल, आणि त्यानंतर पुरेश्या लाल रक्तपेशी शरीरामध्ये तयार होत नसतील तर अश्या परिस्थितीमध्ये ही अॅनिमिया उद्भवू शकतो. विशेषतः वयात आलेल्या मुलींच्या बाबतीत मासिक पाळीमध्ये होणाऱ्या रक्तस्रावामुळे, आणि त्यांच्या शरीरामध्ये पुरेश्या लाल रक्तपेशी तयार होत नसल्याने अॅनिमिया होण्याचा धोका संभवतो. शरीरामध्ये इतर कोणती व्याधी असेल, आणि त्याचे निदान झालेले नसेल, तर त्या व्याधीमुळे शरीरातील निरोगी लाल रक्तपेशी नष्ट होऊ लागतात. अश्या वेळीही अॅनिमिया उद्भवू शकतो.

लहान मुलांमध्ये अॅनिमिया ओळखण्याची अनेक लक्षणे आहेत. अॅनिमिया असलेल्या मुलांची त्वचा अतिशय फिकट रंगाची दिसू लागते. तसेच नखे आणि डोळेही गुलाबी न दिसता फिकट, पांढरे दिसू लागतात. अॅनिमिक असलेली लहान मुले जास्त श्रम न होताही सहज थकून जातात. तसेच त्यांच्या शरीरामध्ये नेहमीच थोडाफार अशक्तपणा असतो. त्यामुळे या मुलांचा स्वभाव काहीसा चिडचिडा बनतो. जर अॅनिमिया जास्त असेल, तर अश्या परिस्थितीमध्ये मुलांच्या हाता-पायांवर हलकी सूज दिसून येते, तसेच या मुलांना वारंवार दम लागतो. अश्या मुलांचे हृदयाचे ठोकेही जलद पडताना दिसून येतात. यांच्यापैकी कोणतीही लक्षणे मुलांमध्ये आढळ्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अॅनिमियाचे निदान करणे ही फारशी अवघड गोष्ट नाही. रक्ताची तपासणी केल्याने अॅनिमियाचे निदान होऊ शकते. एकदा निदान झाले, की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केल्याने या व्याधीवर मात करता येणे शक्य असते. अॅनिमिया हा काही बाबतीत टाळता येत नसला, ( अनुवांशिक असल्यास) तरी शरीरामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे किंवा अन्य पौष्टिक तत्वांच्या अभावी उद्भविलेला अॅनिमिया आहारामध्ये योग्य बदल करून बरा करता येऊ शकतो. जर अगदी तान्ह्या मुलांना अॅनिमिया असेल तर अश्या मुलांना मातांनी स्तनपान करविणे गरजेचे आहे. मातेच्या दुधातून मुलाला लोह मिळत असते. तसेच मुलांना घन आहार सुरु करताना लोह जास्त मात्रेमध्ये असलेले अन्नपदार्थ थोड्या थोड्या प्रमाणामध्ये अवश्य खाऊ घालावेत.

अॅनिमिया मोठ्या मुलांचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे. डाळी आणि कडधान्ये, अंड्याचा बलक, बटाटे, शेंगभाज्या, बेदाणे, केळी, सफरचंद, आणि बीट ह्या पदार्थांचे सेवन अॅनिमिया असलेल्या मुलांनी करणे लाभकारक ठरते. तसेच मुलांना संत्री, मोसंबी ह्यांचे रस, किंवा लिंबू सरबत नियमित प्यायला द्यावे. या सर्व पदार्थांमध्ये क जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असल्याने शरीरामध्ये लोह व्यवस्थित अवशोषित होते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारही अॅनिमिया कमी करण्यास सहायक असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment