मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनचा माफीनामा; दिले मराठीचा समावेश करण्याचे आश्वासन


मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेले असून आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन अ‍ॅमेझॉनने दिल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंची अ‍ॅमेझॉनकडून दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे.

त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत, असे त्यांनी टाकले आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचे पाणी पाजणार असे सांगितले होते. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अ‍ॅमेझॉन प्रशासन खडबडून जागे झाले, असे अखिल चित्रे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे, आमचे सचिव, पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी अशी आमची पहिली अट होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ५ तारखेला सर्व केसेस ते रद्द करणार आहेत.