या महापौर तरुणीने मोडला फडणवीसांचा रेकॉर्ड


थिरुवनंतपुरम : काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातील सर्वांत तरुण महापौर अशा विक्रमाची नोंद महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे होती. नागपूर महापालिकेचे फडणवीस 21 व्या वर्षीच नगरसेवक झाले होते आणि तोही एका प्रकारे विक्रमच होता. पण आता फडणवीस आणि त्यानंतरच्या इतर तरुण महापौरांवर मात करत केरळच्या एका तरुणीने 21 व्या वर्षीच महापौर पदी विराजमान होण्याचा विक्रम केला आहे.

आर्या राजेंद्रन यांची केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. या शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून निवड झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य असलेल्या आर्या राजेंद्रन देशातील आतापर्यंतच्या सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत. तिरुवनंतपुरमच्या LBS कॉलेजमध्ये आर्या राजेंद्रन यांचे शिक्षण सुरू आहे. त्या तिथून इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी अभ्यास करत आहेत. पण इंजिनीअर व्हायच्या आधीच त्या शहराच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

आर्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत कार्यरत होत्या. त्यांचा SFI च्या पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. महापालिकेची निवडणूक आर्या यांनी पहिल्यांदाच लढवली. CPIM च्या जिल्हा सचिवालयानेच त्यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. थिरुवनंतपुरमच्या मुदवनमुगल वॉर्डातून त्या निवडून आल्या. एवढ्या लहान वयात नगरसेवक होण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्याहून मोठा मान त्यांना शुक्रवारी मिळाला, जेव्हा त्यांची महापौरपदासाठी निवड झाली.

देवेंद्र फडणवीस यांना 1997 साली महाराष्ट्रात हा मान मिळाला होता. त्यांची नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर म्हणून निवड झाली होती. फडणवीस यांचे वय त्यावेळी 27 वर्षं होते. त्याअगोदर आर्या राजेंद्रन यांच्याप्रमाणेच वयाच्या 21 व्या वर्षी ते नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले होते.