ममता बॅनर्जींना नव्याने भाजप प्रवेश केलेल्या सुवेंदु अधिकारी यांचा इशारा


कोलकाता – पक्षनेतृत्वाशी असलेल्या मतभेदातून काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी राजीनामा दिला. ममता बॅनर्जी सरकारमध्ये ते राज्याचे परिवहन मंत्री होते. आपल्या आमदारकीचा आणि त्यापाठोपाठ पक्षाच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे सुवेंदु अधिकारी यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला हजेरी लावली. त्यांनी प्रचारसभेत बोलताना आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

गोपीबल्लभपूरचे दिलीप घोष आणि कांठीचे सुवेंदु अधिकारी आता एकत्र आल्यामुळे त्यांची एकत्रित शक्ती खूप वाढली आहे. त्यामुळे तृणमूल सरकारला आता सत्ता सोडावीच लागेल. सध्या केवळ वादळ सुरू आहे. खऱ्या अर्थाने त्सुनामी पुढच्या वर्षी निवडणुका लागल्यावर सुरू होईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सुवेंदु अधिकारी यांनी दिला. कोंटाई आणि त्याआधी मिदनापूरच्या कांठीमध्ये गुरूवारी अधिकारी यांनी प्रचारसभांना हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ममत बॅनर्जींच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

त्यांनी याआधीही ममतादीदींवर टीका केली होती. ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. मला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रचंड मानसिक छळाला सामोरे जावे लागले. ज्या नेत्यांनी त्यावेळी मला त्रास दिला, ते मला आता पाठीत खंजीर खुपसणारा माणूस, अशी उपमा देत आहेत. ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नसून त्या कुणाचाच विचार करत नाहीत. पण एक गोष्ट मी खात्रीने सांगतो की २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेसला जिंकता येणार नाही, असे सुवेंदु अधिकारी पक्षप्रवेशाच्या वेळी म्हणाले होते.