धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटातून शाहिद कपूरचा काढता पाय!


‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने अभिनेता शाहिद कपूर प्रकाशझोतात आला. त्याने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांसह समिक्षकांनीही दाद दिल्यामुळेच शाहिदच्या लोकप्रियतेत ‘कबीर सिंह’नंतर कमालीची वाढ झाली असून आता त्याच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या ‘जर्सी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये शाहिद व्यस्त आहे. तर दुसरीकडे धर्मा प्रोडक्शनचा एक चित्रपट करण्यास त्याने नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘बॉलिवूड हंगामा’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद ‘जर्सी’ चित्रपटासोबतच ‘योद्धा’ या चित्रपटात झळकणार असल्याचे सांगितले जाते होते. पण या चित्रपटाचा आता शाहिद भाग नसणार आहे. हा चित्रपट करण्यास शाहिदने स्वत: नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. धर्मा प्रोडक्शन अंतर्गत ‘योद्धा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून शशांक खेतान त्याचे दिग्दर्शन करत आहेत.

शाहिद ‘जर्सी’चे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ‘योद्धा’च्या चित्रीकरणास सुरुवात करणार होता. पण या चित्रपटातील काही भाग न पटल्यामुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहिदला ‘योद्धा’मधील काही भाग न पटल्यामुळे ते काढून टाकावे किंवा त्यात बदल करावा असे शाहिदचे मत होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांना त्याचे हे मत मान्य नसल्यामुळे या चित्रपटातून शाहिदने काढता पाय घेतला आहे.