रिझर्व्ह बँकेने रद्द केला महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना


कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया लिमिटेड बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी सुरु केलेल्या या बँकेच्या १३ शाखा आहेत. या बँकेचे अन्यत्र विलीनीकरण होणार असल्याचे सांगण्यात येते. रिझर्व्ह बँकेने याआधीच सुभद्रा बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लागू केल्यानंतर या बँकेच्या कामकाजावर गुरुवारी बंदी घातल्याचे आरबीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये गोंधळ उडाला आहे.

या बँकेची स्थापना सुमारे २००३ च्या सुमारास झाली होती. बँकेत सुमारे दीडशे कर्मचारी काम करतात. पूर्वी स्टेट बँकेच्या कोषागार शाखेजवळ मुख्यालय होते. ते अलीकडील काही वर्षात जेम्सस्टोन संकुलात स्थलांतरित झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले होते. त्यामुळे कर्जव्यवहार पूर्णत: बंद होते. फक्त कर्जवसुलीस प्राधान्य द्यावे, अशा सूचना होत्या. ठेवीदारांचे पैसे नियमित परत मिळत होते. त्याबद्दल कुणाची तक्रार नव्हती. तरीही बँकिंग परवाना का रद्द झाला याचे कारण समजू शकले नाही.