बलात्काराची तक्रार करायला गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार


अलाहाबाद – पोलीस ठाण्यात सामुहिक बलात्काराची तक्रार करायला गेलेल्या पीडितेवर तेथील एका पोलीस अधिकाऱ्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ही घटना उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे घडली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी पत्रकारांना जलालाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदनपूर गावात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने सांगितले की, ती ३० नोव्हेंबर रोजी आपल्या घरी पायी निघाली होती. यावेळी एक कार तिच्याजवळ येऊन थांबली आणि त्यानंतर कारमधील पाच जणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि जवळच्या शेतात नेऊन सामुहिक बलात्कार केला.

पीडित महिलेने या प्रकारानंतर जलालाबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. या पोलीस ठाण्यात त्यावेळी एक पोलीस उपनिरिक्षक उपस्थित होता, तिला त्याने त्याच्या खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. या दोन्ही धक्कादायक प्रकारांनंतरही पीडितेची तक्रार न नोंदवली गेल्यामुळे तिने थेट बरेलीचे सहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर एडीजी चंद्रा यांनी महिलेच्या तक्रारीची चौकशीचे आदेश दिले.