मनसेचा खळखट्याक, पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड


मुंबई – राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या मुद्द्यावरुन प्रचंड आक्रमक झाली असून पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. चांदिवली येथील अ‍ॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. याआधी पुण्यातील अ‍ॅमेझॉनचे कार्यालय फोडण्यात आले होते. मनसे कार्यकर्त्यांकडून पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

अ‍ॅमेझॉनने मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात कोर्टात धाव घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना कोर्टाने ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचे पाणी पाजणार, अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.