औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची राष्ट्रवादीकडून औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांची औरंगाबाद जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदावरून गच्छंती होऊन त्यांच्याजागी आता औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी रादेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांची जनमानसात चांगली छबी तयार झाली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला त्यांच्या कामाचा आणि छबीचा फायदा व्हावा, यासाठी पक्षाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
धनंजय मुंडे यांच्याऐवजी आता औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी राजेश टोपे
आता राजेश टोपे धनंजय मुंडे यांच्याऐवजी औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी असणार आहेत. त्यामुळे महापालिकेचा संपूर्ण निवडणूक प्रचार तसेच कार्यक्रमाची जबाबदारी राजेश टोपे यांच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. राष्ट्रवादीला औरंगाबाद पालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी टोपे यांच्यावर असणार आहे.
मराठवाड्यातील नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर आतापर्यंत मराठवाड्यातील निवडणुकीची सगळी जबाबदारी असायची. किंबहुना मराठवाड्यातील निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जायचे. पण आता राष्ट्रवादीने औरंगाबाद महापालिकेची मोठी जबाबदारी राजेश टोपे यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर भारतातही कोरोनाने हैदोस माजवला. विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाने आपले हातपाय सर्वाधिक पसरले. अशतही आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी आपली जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडली. अगदी मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून ते राज्यातील जनतेला धीर देत होते. तसेच कोरोनाच्या ऐन काळात विविध हॉस्पिटलला भेटी देऊन ते कोरोना वॉरिअर्सचा धीर वाढवत होते. राज्यातील जनतेला खूप दिवसांनी असा आरोग्यमंत्री लाभल्याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत होती.