दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात गिल-सिराजचे पदार्पण


नवी दिल्ली – टीम इंडियाची बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या कसोटी सामन्याद्वारे शुबमन गिल आणि मोहम्मद सिरज यांचे पदार्पण होणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवनंतर भारतीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. यावेळी पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे.

दुखापतीतून अष्टपैलू रविंद्र जाडेजा सावरला असून त्याला देखील अंतिम ११ खेळाडूमध्ये संधी देण्यात आली आहे. अश्विन आणि जाडेजा फिरकीपटूची धुरा सांभाळतील. तर बुमराह आणि उमेश यादव यांच्यासोबत युवा मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच गोलंदाजसोबत मैदानात उतरणार आहे.

अंतिम ११ मध्ये ऋषभ पंतलाही संधी देण्यात आली आहे. वृद्धिमान साहाला पहिल्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरीमुळे आराम देण्यात आला आहे. त्याच्याजागी पंतला संधी देण्यात आली आहे. के. एल. राहुलला संघात स्थान मिळवता आले नाही. शुबमन गिल आणि मयांक अगरवाल भारतीय डावाची सुरुवात करतील.

असा आहे भारतीय संघ – शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज