दाऊदच्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी मुंबईत १९९३ साली झालेल्या भीषण सिरीयल बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी फरार असलेल्या गँगस्टर दाऊद इब्राहिमला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. पण त्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे कालांतराने स्पष्ट झाल्यानंतर दाऊदच्या पुतण्याचा बुधवारी कोरोनामुळे पाकिस्तानात मृत्यू झाला. कराचीत दाऊदच्या मोठ्या भावाचा मुलगा सिराज याचा मृत्यू झाला.

याबाबत मुंबईच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार सिराज कासकर असे दाऊदचा मोठा भाऊ सबीर कासकर याच्या मुलाचे नाव असून, तो ३८ वर्षांचा होता. सुरूवातीला एका टोळीचा दाऊदचा भाऊ सबीर म्होरक्या होता. पण गँगस्टर मन्या सुर्वेने पठाण गँगच्या साथीने १२ फेब्रुवारी १९८१ला सबीर गोळी घालून ठार केले. मुंबईवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा राखण्याच्या प्रयत्नात गँगवारचा उगम झाला आणि त्यानंतर त्यातूनच मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊद कुविख्यात गँगस्टर झाला.

मुंबई गुन्हे शाखेतील सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दाऊदचा पुतण्या सिराज याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर श्वसनाचा त्रास त्याला जाणवू लागला. म्हणून कराचीतील एका खासगी रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला दोन दिवस लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. पण सिराजची प्रकृती बुधवारी अधिकच ढासळली. पल्स रेटमधील अनियमितता आणि एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्याने अखेर त्याचा ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मृत्यू झाला. कराचीतील नातेवाईकांकडून ही माहिती मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. कराचीतील क्लिफ्टन परिसरात दाऊदच्या बंगल्याच्या बाजूलाच एका मोठ्या बंगल्यात सिराज वास्तव्यास होता.