३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत भीमा कोरेगावमध्ये जमावबंदी


पुणे – १ जानेवारी रोजी लाखो नागरिक पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी येत असतात. पण यंदा भीमा कोरेगाव सह अकरा गावामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहे. जमावबंदीचे कलम १४४ भीमा कोरेगावमध्ये लागू करण्यात आले आहे.

१ जानेवारी रोजी दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यात येत असतात. पण यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वर्षभरामध्ये आपण सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहे. हे लक्षात घेऊन, ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना भीमा कोरेगावच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.