शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा


नवी दिल्ली : मोदी सरकारने लागू केलेली तीन कृषि विधेयके रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. ज्या योजना सरकारने सुरु केल्या आहे. त्यांना त्याचा कसा फायदा झाला? गावातील तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना त्यांनी याची माहिती दिली का? ते जाणून घेतल्या. मोदी यांनी शेतकऱ्यांशी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधला. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मोदी देशभरातील २५०० चौपालांमधील शेतकर्‍यांना संबोधित केले. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणून भाजप साजरा करत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हस्तांतरित केला. १८००० कोटी रुपये नऊ कोटीहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले. मोदी म्हणाले, आज एका क्लिकवर देशातील ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. ही योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून १ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषण दरम्यान पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मला आज खेद आहे की हा लाभ पश्चिम बंगालमधील ७० लाखाहून अधिक शेतकरी आणि भावंडांना मिळवता आला नाही. बंगालच्या २३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. परंतु एवढ्या दिवसांपासून राज्य सरकारने पडताळणी प्रक्रिया थांबविली आहे. जनता स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना फार बारकाईने पाहात आहे. पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांच्या हिताची भाषा न करणारे पक्ष दिल्लीतील नागरिकांना शेतकऱ्यांच्या नावाने त्रास देण्यास गुंतले आहेत, ते देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात मग्न आहेत.