योगी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १ लाख ८९ हजार ३६ झाडांची कत्तल


लखनौ – उत्तर प्रदेमधील तब्बल एक लाख ८९ हजारांहून अधिक झाडे बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी तोडण्यात आली आहेत. माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यासंदर्भातील माहिती संबंधित खात्यानेच दिली आहे. आरटीआयअंतर्गत देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ही वृक्षतोड बांदा, चित्रकूट, माहोबा, हमीरपूर, जुलाउन, औरिया आणि इटवाह या प्रदेशात झाली आहे.

बुंदेलखंड हा चार पदरी द्रुतगती महामार्ग २९६ किलोमीटर लांबीचा आहे. इटवाह ते चित्रकूटला जोडणारा हा महामार्ग उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांना यमुना द्रुतगती महामार्गाद्वारे थेट नॅशनल कॅपिटल रिजनला जोडणार आहे. एक लाख ८९ हजार ३६ झाडांची याच प्रकल्पासाठी कत्तल करण्यात आली आहे. बांदातील सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या कुलदीप शुक्ला यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला उत्तर प्रदेशमधील वन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अतुल अस्थाना यांनी उत्तर दिले आहे. महामार्गाच्या बांधकामासाठी उत्तर प्रदेश द्रुतगती महामार्ग औद्योगिक विकास प्राधिकरणाने (युपीईआयडीए) १ लाख ८९ हजार ३६ झाडे कापली असल्याचे या उत्तरामध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेश द्रुतगती महामार्ग औद्योगिक विकास प्राधिकरणाकडून या तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात दोन लाख ७० हजार झाडे लावली जाणार आहेत. ही झाडे नव्याने निर्माण होणाऱ्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपणाच्या माध्यमातून लावली जाणार असल्याचे माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. ही वृक्षतोड केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतरच कापण्यात आल्याचे बांदा येथील विभागीय वनअधिकारी असणाऱ्या संजय अग्रवाल यांनी म्हटले आहे. बुंदेलखंड द्रुतगती महामार्गामुळे या प्रदेशातील उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांना थेट एनसीआरशी जोडले जाणार आहे.