१ जानेवारी पासून फास्टॅग बंधनकारक- नितीन गडकरी
फोटो साभार इंडिया डॉट कॉम
नवीन वर्षात म्हणजे १ जानेवारी २०२१ पासून देशातील सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग बंधनकारक असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग, रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गुरुवारी एका व्हर्चुअल कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले प्रवाशांना ही सुविधा खुपच लाभकारक आहे.
फास्टॅग ही टोल प्लाझावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल भरण्याची सुविधा असून यासाठी वाहनांना टोल नाक्यावर थांबावे लागत नाही आणि रोख रकमेत टोल भरावा लागत नाही. देशात ही सुविधा २०१६ साली सुरु झाली आहे. त्यावेळी चार बँकांनी त्या वर्षी सामुहिक स्वरुपात १ लाख टॅग जारी केले होते. २०१७ मध्ये आणखी ७ लाख, २०१८ मध्ये ३४ टॅग जारी करण्यात आले होते.
गडकरी म्हणाले मंत्रालयाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार १ जानेवारी २०२१ पेक्षा जुनी वाहने किंवा १ डिसेंबर २०१७ पूर्वीची वाहने याच्यासाठी फास्टॅग बंधनकारक केला गेला आहे. या सुविधेमुळे प्रवाश्यांना टोल नाक्यावर प्रतीक्षा करावी लागत नाही त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन बचत होते.
केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ नुसार १/१२/२०१७ पासून चार चाकी वाहने नोंदणी करताना, वाहन फिटनेस प्रमाणपत्र, राष्ट्रीय परमिट यासाठी फास्टॅग २०१९ पासून बंधनकारक आहे. आता वाहनाच थर्ड पार्टी विमा घेतानाही १ एप्रिल २०२१ पासून फास्टॅग असणे आवश्यक आहे.