वर्षअखेरी घटस्फोट मिळविण्यासाठी चीनी जोडप्यांची धावाधाव

फोटो साभार ग्लोबल टाईम्स

चीन मध्ये करोना काळात घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले होते आणि त्या काळात लॉकडाऊन लागल्याने ठराविक जोडप्यांनाच नंबर लावून कायदा कार्यालयात जाऊन घटस्फोट मिळविता आला होता. त्यावेळी सुद्धा घटस्फोट प्रकरणे तेजीत होती पण आता वर्षअखेरी म्हणजे ३१ डिसेंबर पूर्वी घटस्फोट मिळवा यासाठी ज्या जोडप्यांनी अगोदरच अर्ज केले आहेत त्यांची अक्षरशः पळापळ सुरु झाली आहे.

यामागे असे कारण दिले जात आहे की, १ जानेवारी पासून चीन मध्ये पहिली नागरिक संहिता लागू होणार आहे. त्यामुळे घटस्फोटासाठीचे नियम बदलणार आहेत. आजपर्यंत चीन मध्ये दोन चार दिवसात घटस्फोट घेता येत असे पण नवीन नियमानुसार ते अवघड होणार आहे. परिणामी नवीन नियम लागू होण्यापूर्वी घटस्फोट मिळावा यासाठी धावपळ सुरु आहे.

सिक्स्थटोन डॉट कॉम नुसार शांघाय घटस्फोट कार्यालयात येणाऱ्या जोडप्यांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. ग्वांगझु, शेंसेन येथे ऑनलाईन अपॉइंटमेंट स्लॉट पूर्ण फुल आहेत आणि कार्यालयांसमोर लांब रांगा लागत आहेत. या नव्या नियमांना विरोध होत असून त्यामुळे घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. २००३ पासून चीन मध्ये घटस्फोट प्रमाण वाढले असून २०१९ मध्ये ४७ लाख जोडप्यांनी काडीमोड घेतल्याचे आकडेवारी सांगते. महिलां आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने घटस्फोट प्रकारात वाढ झाल्याचेही म्हटले जात आहे.