जगातील पाच सर्वात मोठ्या बक्षीस रकमेच्या लॉटरी

कुणालाही अचानक बराच पैसा मिळाला, किंवा कुणी अफाट खर्च करत सुटला तर आपण त्याला, ‘ काय लॉटरी लागली काय?’ असे सहज विचारतो. लॉटरी म्हणजे अगदी कमी किमतीचे तिकीट घेऊनही भली मोठी रक्कम बक्षीस देणारी योजना असे म्हणता येईल. आज नाताळ आहे. युरोपीय खंडात हा मोठा सण असून या दिवसात अनेक प्रकारच्या लॉटरी येतात आणि त्यातून मोठी बक्षिसे ग्राहकाला मिळू शकतात. आजपर्यंत सर्वात मोठी लॉटरी किती रकमेची होती हे अनेकांना माहिती नसेल.

अमेरिकेत १३ जानेवारी २०१६ रोजी पॉवरबॉल लॉटरीचा जॅकपॉट तीन लोकांना लागला होता. हा जॅकपॉट १.५९ अब्ज डॉलर्स म्हणजे ११६.९ अब्ज रुपयांचा होता. यात विजेत्या प्रत्येकाच्या वाटणीला ३२७.८ दशलक्ष डॉलर्स आले होते.

सिंगल तिकीट लॉटरी पॉवरबॉल जॅकपॉटने २३ ऑगस्ट २०१७ मध्ये रेकॉर्ड केले होते. ही लॉटरी मावीस नावाच्या माणसाने एकट्याने जिंकली होती. त्याला बक्षीस म्हणून ५६ अब्ज १ कोटी रुपये मिळाले होते.

तिसरी लॉटरी आहे युरोप मधील. स्पेन मध्ये जगातील सर्वात मोठ्या नाताळ लॉटरीचे आयोजन केले जाते. एल गोर्डो असे तिचे नाव असून दरवर्षी २२ डिसेंबररोजी तिचा ड्रा काढला जातो. यंदाही तो काढला गेला. त्याचे टीव्ही वर थेट प्रसारण केले गेले. याच्या बक्षिसाची रक्कम होती १७२८ कोटी म्हणजे २.४३ अब्ज डॉलर्स.

चौथी लॉटरी नेदरलंड मधील आहे. स्टासलोटेरिज ही ३०० वर्षापूर्वी सुरु झालेली लॉटरी आजही सुरु आहे. लॉट या डच शब्दाचा अर्थ आहे नशीब. त्यापासून लॉटरी हा शब्द आला आहे. ही लॉटरी १७२६ मध्ये हेग येथे सुरु झाली होती. अर्थात ही जगातील पहिली लॉटरी नाही. पहिली लॉटरी १४४९ साली निघाली होती.

पाचवी बडी लॉटरी युरोपातील सर्वात मोठी युरोमिलियन लॉटरी आहे.१२ जुलै २०११ मध्ये त्यात १६१.७ दशलक्ष पौंड म्हणजे १६ अब्ज १२ कोटीचे इनाम दिले गेले. हे इनाम सिंगल तिकीटावरच होते.