आम्ही बंगालला गुजरातसारखे करण्याची सहमती देऊ शकत नाही – ममता बॅनर्जी


कोलकाता – मागील महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये घमासान सुरू आहे. हे राजकीय वैर गेल्या काही दिवसांत आणखी तीव्र होत असल्याचे दिसून आले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्लाबोल केल्यानंतर अखेर भाजपला ममता बॅनर्जी यांनीही प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

आगामी वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे तेथील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, भाजप-तृणमूल काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. अमित शहा यांच्या बंगाल दौऱ्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर पलटवार केला.

ममता बॅनर्जी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या, बंगालची भूमी आमची जीवन स्त्रोत असून ही भूमी आपल्याला सुरक्षित ठेवावी लागेल. आपल्याला याचा अभिमान बाळगावा लागेल. बाहेरून येणाऱ्यांनी म्हणावे की, ही भूमी गुजरातसारखीच होऊन जाईल, असे व्हायला नको. हाच संदेश आमचा आहे की, सगळ्यांसाठीच आम्ही आहोत. सगळ्यांसाठीच मानवता आहे. मग तो शीख असो, जैन असो वा ख्रिश्चन. त्यांच्यामते फूट पाडण्याची परवानगी आम्ही देणार नसल्याचे म्हणत ममतांनी भाजपवर टीका केली.

पश्चिम बंगालमधून राष्ट्रगीत आणि जय हिंदचा नारा देण्यात आला. सर्वोकृष्टतेला बंगाल महत्त्व देतो. बंगालला आम्ही गुजरातसारखे करण्याची सहमती देऊ शकत नसल्याचे त्या म्हणाल्या. तृणमूल काँग्रेसमधून अलिकडेच भाजपमध्ये दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यावरही ममतांनी निशाणा साधला. राज्यातील राजकारणात गद्दारांना कोणतेही स्थान नाही. कोणत्याही परिवाराची कोटई जहागिरी नाही. समुद्रातून दोन भांडी पाणी काढले तर काही फरक पडत नसल्याचे म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्यांवर त्यांनी टीका केली.