‘आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश ; बीसीसीआयची मंजुरी


अहमदाबाद – दोन नवीन संघांचा ‘आयपीएल’मध्ये समावेश करण्यात आला असून आयपीएलचे एकूण दहा संघ २०२२ च्या हंगामात असतील. अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) देण्यावरही एकमत झाले आहे. या सभेमध्ये २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही निर्णय झाला.

‘आयपीएल’चे संघ २०२१मध्ये वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया एवढ्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२पासून १० संघांचे ‘आयपीएल’ असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. नव्या दोन संघाबाबत आयपीएल २०२१ नंतर लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

‘आयसीसी’ने जागतिक दर्जाच्या स्पर्धाकरिता करसवलतीसाठी दिलेल्या मुदतीला आता फक्त आठवडा उरला आहे. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह आणि खजिनदार केंद्र सरकारशी चर्चा करणार आहेत. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताला टिकवायचे असेल, तर पूर्ण करसवलतीची खात्री द्यावी लागेल, अन्यथा ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित होईल. क्रीडा स्पर्धांना देशातील सध्याच्या कायद्यानुसार करसवलत मिळत नाही. यावरच बीसीसीआय सचिव आणि खजिनदार केंद्र सरकारशी चर्चा करतील.

१० संघांचा समावेश झाल्यास, अडीच महिन्यांच्या कालावधीत ९४ सामने खेळवताना आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बिघडण्याची भीती आहे. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंची उपलब्धता हाही कळीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर प्रसारणकर्ते प्रत्येक वर्षी ६० सामन्यांसाठी पैसे मोजत असतात. स्टार इंडियाने २०१८-२०२२ या कालावधीसाठी प्रत्येक ६० सामन्यांच्या मोसमाकरिता १६३४७ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढल्यास, त्यांच्याशी नव्या कराराबद्दल बोलणी करावी लागेल. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये आठ संघ असतील. २०२२ च्या हंगामात आयपीएलमध्ये दहा संघाचा समावेश असेल.