पोलिसांनी नाकारली पुण्यातील एल्गार परिषदेला परवानगी


पुणे : राज्य सरकारकडून 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभचं देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण करण्यात येणार आहे.

कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात लावण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. पण दुसरीकडे एल्गार परिषदेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी शहरातील परिस्थिती व कोरोनाचे नवे संकट लक्षात घेऊन ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे. ही परवानगी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील लोक शासन आंदोलन या संस्थेने मागितली होती.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एल्गार परिषदेला संमती देऊ नये म्हणून अर्ज केले होते. तर हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. पण या परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधित काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास NIA देण्यात आला होता.