ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनपासूनही संरक्षण करेल मॉडर्नाची लस


वॉशिंग्टन – अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून आमची लस सुरक्षा प्रदान करेल अशी आशा व्यक्त केली असून यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

बुधवारी मॉडर्ना आयएनसीने म्हटले की, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनपासून आमची लस रोगप्रतिकारशक्ती वाढवेल, अशी आम्हाला आशा आहे. कोरोनाच्या कोणत्याही नव्या स्ट्रेशसोबत लढण्याची क्षमता तपासण्याची वेगळी चाचणी करण्याचाही विचार कंपनीचा आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये कडक कोरोना प्रतिबंधक लावण्याचा विचार असल्याचे म्हटल्यानंतर मॉडर्नाने यासंदर्भात भाष्य केले आहे.

कोरोनाच्या साथीचा उद्रेक झाल्यापासून उद्भवलेल्या SARS-CoV-2 व्हायरसच्या पूर्वीच्या असंख्य प्रकारांविरूद्ध आम्ही प्राण्यांवर आणि मानवावर यापूर्वीच चाचणी केली आहे, आमची लस या चाचणीमध्येही तितकीच प्रभावी ठरल्याचा दावा मॉडर्नाने केला आहे. येत्या आठवड्यांमध्ये आमच्या अपेक्षापूर्तीसाठी आम्ही लसीच्या आणखी चाचण्या घेणार असल्याचेही अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्नाने स्पष्ट केले आहे.