मुंबईकरांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उघडू शकतात लोकलचे दरवाजे


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा मार्च महिन्यापासून सामान्यांसाठी बंद आहे. अनलॉकमध्ये लोकल ट्रेन फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु करण्यात आल्या. त्यानंतर नवरात्रात महिलांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली. लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत होता. त्याबाबत आता विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईची लोकल ट्रेन सेवा सरसकट सगळ्यांसाठी सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकारात्मक असून जानेवारीच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये लोकल सेवा सरसकट सगळ्यांसाठी सुरु करण्यात यावी, असा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मार्च महिन्यात जेव्हा लॉकडाउन करण्यात आला, तेव्हा मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आल्यानंतर हळूहळू अनलॉकमध्ये लोकल आधी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, त्यानंतर वकिलांसाठी आणि त्यानंतर महिलांसाठी सुरु करण्यात आली.

लोकल प्रवासाची मुभा कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन देण्यात आली. जेव्हा ऑक्टोबर महिन्यात मुंबई लोकल महिलांसाठी सुरु करण्यात आली, तेव्हा लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी सुरु होणार हा प्रश्न विचारला जात होता. लोकल सगळ्यांसाठी सुरु करण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्रेही पाठवली होती. मात्र त्यावर काही उत्तर आले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यासाठी सकारात्मक असल्याचे समजत आहे.