टीम इंडियातील भेदभाव सुनील गावस्कर यांनी आणला समोर


नवी दिल्ली – टीम इंडियात सर्वकाही आलबेल असल्याचा कितीही दावा केला जात, असला तरी टीम इंडियातील भेदभाव भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी समोर आणला आहे. संघात आर अश्विन आणि टी नटराजन या गोलंदाजांना दुटप्पी वागणुक मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर संघात खेळाडूंनुसार नियम बदलत असल्याचेही ते म्हणाले.

कर्णधार विराट कोहली याच्यावरही सुनील गावस्कर यांनी निशाणा साधला. विराट पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी सुट्टीवर गेला आहे आणि त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी परतण्याची परवानगी मिळाली. तेच दुसरीकडे टी नटराजन याला त्याच्या मुलीला अजूनही भेटता आलेले नाही. त्याच्या घरी ही गोडबातमी इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफ दरम्यान आली होती.

गावस्कर म्हणाले, कसोटीत ३५० गडी बाद करणारा अश्विन संघात असावा असे देशातील क्रिकेट चाहत्यांना वाटते. पण, त्याला एका सामन्यातील खराब कामगिरीनंतर पुढील सामन्यात बाकावर बसवले जाते. पण, असे नावाजलेल्या फलंदाजाबाबत घडत नाही. दुसरा नियम अश्विनसाठी लावला जातो. केवळ नेट गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियात टी नटराजनला ठेवले गेले आहे, यावरही गावस्करांनी लक्ष वेधले.