मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखला, १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा


नवी दिल्ली – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या १३ शेतकऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसने हरियाणा सरकारच्या या कृत्यावर कडाडून टीका केली आहे. सरकार शेतकऱ्यांसंबंधी कसे निष्ठूर आहे हे या कारवाईमधून जाहिर होत असल्याचे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कुमारी सेजला म्हणाल्या. मंगळवारी हरियाणाच्या अंबालामध्ये शेतकऱ्यांच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते.

मुख्यमंत्री खट्टर अंबालामध्ये आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभांना संबोधित करण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा अंबालाच्या अग्रसेन चौकात येताच काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवले होते. त्याचबरोबर सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा काही शेतकऱ्यांनी प्रयत्न केला आणि काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. त्यातील काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर लाठ्या फेकल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान हरियाणा सरकारने शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करुन सर्व मर्यादा ओलांडल्या असून शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणारे सरकार किती निराशेच्या गर्तेत बुडले असल्याचे येत आहे, असे कुमारी सेजला म्हणाल्या.

शेतकऱ्यांचा आवाज भाजप सरकारकडून वारंवार दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जनतेचा विश्वास भाजप सरकारने गमावला आहे. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यामुळेच शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री खट्टर यांना काळे झेंडे दाखवले जात असल्याची टीका कुमारी सेजला यांनी केली.