मनसे विरुद्ध अ‍ॅमेझॉन वाद आणखी पेटण्याची शक्यता


मुंबई: मनसेचा मराठी भाषेवरुन पुन्हा एकदा वाद पेटल्याचे समोर आले असून मराठी भाषेचा पर्याय अ‍ॅमेझॉनवरउपलब्ध व्हावा, मनसेने यासाठी सुरु केलेल्या मोहिमने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. पण अ‍ॅमेझॉनने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसे सचिवांना दिंडोशी न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरेंना या नोटीसमध्ये 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे मनसे विरुद्ध अ‍ॅमेझॉन हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर अ‍ॅमेझॉनला इशारा दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने यांची मोठी किंमत ॲमेझॉनला मोजावी लागणार आहे. आम्हीही त्यांना नक्कीच कायदेशीर उत्तर देऊ, असे अखित्र चित्रे यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात ॲमेझॉनला मराठी मान्य नाही. मग महाराष्ट्रात आम्हालाही ॲमेझॉन मान्य नाही. तसेच ॲमेझॉन लवकरात लवकर वठणीवर आले नाही, तर त्यांचा व्यवसाय महाराष्ट्रात पूर्णपणे ठप्प होईल, असा इशाराही अखिल चित्रे यांनी ॲमेझॉनला दिला आहे.

तत्पूर्वी, इतर राज्यांमध्ये संबंधित भाषेचा वापर अ‍ॅमेझॉन करते. पण अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅप किंवा वेबसाईटवर मराठी भाषेचा वापर होताना दिसत नसल्यामुळे अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून मनसे करत आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देत या प्रकरणी आपली मागणी मांडली होती.

मनसेच्या या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी दखल घेतली होती. तसेच त्यांनी मेल द्वारे मराठीच्या वापराबद्दल सकारात्मक असल्याचे मनसेला कळवले होते. यासाठी अ‍ॅमेझॉनचे एक शिष्टमंडळ मुंबईत आले होते. पण दोन महिन्यानंतर मराठीच्या वापराबाबत कोणतेही पाऊल अ‍ॅमेझॉनकडून उचलले न गेल्यामुळे मनसे आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अ‍ॅमेझॉन कंपनीने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतल्याने मनसेने अ‍ॅमेझॉन विरुद्ध ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ या मोहिमेला सुरुवात केली आहे. अ‍ॅमेझॉन वरुन बहुसंख्य मराठी भाषिक खरेदी करतात. त्यामुळे इतर भाषांप्रमाणे अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा वापरही करावा, या अ‍ॅमेझॉनने मनसेच्या मागणीवरुन न्यायालयात धाव घेत अ‍ॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करु शकत नसल्याचे आहे.