जम्मू काश्मीर मधली पहिली बसचालक महिला पूजा देवी

फोटो साभार अमर उजाला

बुधवारी जम्मू काश्मीरला पहिली महिला बसचालक मिळाली असून तिचे नाव आहे पूजा देवी. पूजाने बालपणापासून मोठे वाहन चालविण्याचे स्वप्न पाहिले होते आणि तिचे हे स्वप्न यामुळे पूर्ण झाले आहे. सांदर गावाची रहिवासी असलेल्या पूजाने जम्मू ते काठूआ आणि परत अशी पहिली बस ट्रीप केली त्यावेळी तिला पाहून बसप्रवासी आश्चर्यचकित झाले होते मात्र पूजाचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. या प्रवासामुळे ती जम्मू काश्मीर राज्यातील पहिली व्यावसयिक महिला बस चालक बनली आहे.

या पूर्वी याच मार्गावर पूजाने ट्रक चालविला होता. त्यामुळे तिच्याकडे जड वाहन चालक परवाना आहे. बस युनियन प्रमुख रछपाल सिंग म्हणाले पूजा कडे जड वाहन चालक परवाना होता त्यामुळे आम्ही तिला बस चालवायची परवानगी दिली. अर्थात पूजाचा हा प्रवास सोपा नव्हता. घरून पती आणि अन्य कुटुंबियांना आपल्या घरातील मुलीने सार्वजनिक वाहन चालवावे हे मान्य नव्हते पण पूजाने त्यांना समजावले. पण तिचा स्वतःवर विश्वास आहे हे पाहून घरून परवानगी मिळाली. आता पूजा अन्य महिलांना सुद्धा वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणार आहे. ती म्हणते स्वतःच्या कष्टाच्या कमाईत नक्कीच आनंद असतो आणि तो मी अनुभवत आहे.